जीवघेण्या करोना व्हायरसमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून संचारबंदीमुळे नागरिकांना बाहेरही फिरता येत नाही. त्यामुळे अनेकांची कोंडी झाली आहे. साताऱ्यात एका मुलीला तर तिच्या आईच्या अंत्यसंस्कारालाही जाता आलेलं नाही. तिने व्हिडिओ कॉलिंगद्वारेच आईचं अंत्यदर्शन घेऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सय्यद बुऱ्हाणभाई मुलाणी हे त्यांच्या कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महिमानगड येथे राहतात. मुलाणी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून निवृत्त झाले असून निवृत्तीनंतर ते माण तालुक्यातील सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेत असतात. त्यांची मुलगी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे राहते. मुलगा आणि सून कोरेगाव तालुक्यातील दरे येथे राहतात. मुलाणी आणि त्यांची पत्नी रुक्साना मुलाणी या सायंकाळी घरात गप्पा मारत बसलेले असतानाच अचानक रुक्साना यांची तब्येत खालावली आणि त्या कोसळल्या. त्यामुळे मुलाणी यांची एकच धावपळ उडाली. मात्र, काही कळायच्या आतच रुक्साना यांनी प्राण सोडल्याने मुलाणी कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यानंतर सर्व नातलगांना या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प असल्याने नातलगांना अंत्ययात्रेला येणं शक्य झालं नाही. एकाच जिल्ह्यात राहत असूनही मुलगा, सून आणि दोन पुतण्यांनाही अंत्यविधीला हजर राहता आले नाही. तर जिल्हाबंदीमुळे सोलापूरच्या अकलूजमधून मुलगी निलोफर, जावई आणि नातवंडांनाही इच्छा असूनही रुक्साना यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही.
मुलीने घेतले व्हिडीओकॉलद्वारे आईचे अंत्यदर्शन
• Nagesh Kalasgaunde (Executive Editor)